किलबिल विभाग

हुप हुप करत माकड शिरले घरात

हु S S प... हु SS प... करत, माकड शिरले घरात ।
धडाड --धुडूम डबे पाडले,  कांदे -- बटाटे -- घरभर विखुरले ।
T V  वर जाऊन बसले, खी --खी -- खी -- खी हसू  लागले ।
बाबांनी उगारली काठी, धावले  माकडाच्या पाठी ।
माकड मुळु --मुळु रडत बसले माझ्या सोबत ।
मला सांगू लागले, आमचे जंगल तोडले ।
घर नाही उरले, हरवली पिल्ले !
राहू कसा झाडाविना ? जगू कसा अन्ना विना ? मला त्याचे दुखः कळले, मनाशी एकच ठरवले ।
एक - एक झाड लावायचं, पर्यावरण राखायच ।
माकड झाले खूपच खुश !
गेले करत हु SS प  हु SS प ।

माहिती संकलन: प्राची तुंगार

जाऊ का ग आई खेळायला?

पावसाची सर आली बोलवायला, 
जाऊ का ग आई खेळायला? 

गर गर गिरकी मारायला . . .
भर भर गारा वेचायला ! 

जाऊ का ग आई खेळायला ? 
पाण्यात नावा सोडायला 
अन टप टप तालावर नाचायला 

जाऊ का ग आई खेळायला ?
माहिती संकलन: प्राची तुंगार

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला


असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला

चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार

गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
"हॅलो, हॅलो !" करायला छोटासा फोन !

बिस्कटांच्या गच्‍चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल

चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो

उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला

किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
कवी : राजा मंगळवेढेकर

नाच रे मोरा, अंब्याच्या बनात

नाच रे मोरा, अंब्याच्या बनात
नाच रे मोरा नाच !

ढगांशि वारा झुंजला रे
काळाकाळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच !

झरझर धार झरली रे
झाडांचि भिजली इरली रे
पावसात न्हाऊ, काहितरि गाऊ
करुन पुकारा नाच !

थेंबथेंब तळ्यात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघांत, खेळ खेळु दोघांत
निळ्या सौंगड्या नाच !

पावसाचि रिमझिम थांबली रे
तुझिमाझि जोडी जमली रे
आभाळात छान छान, सातरंगी कमान
कमानीखाली त्या नाच !
 कवी : ग. दि. माडगूळकर

ए आई मला पावसात जाउ दे

ए आई मला पावसात जाउ दे
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे

मेघ कसे बघ गडगड करिती
वीजा नभातुन मला खुणविती
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु दे

बदकांचा बघ थवा नाचतो
बेडुक दादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करु दे

धारेखाली उभा राहुनी
पायाने मी उडविन पाणी
ताप, खोकला, शिंका, सर्दी, वाट्टेल ते होऊ दे
 कवियत्री : वंदना विटणकर

घड्याळा घड्याळा थांब थांब

घड्याळा घड्याळा थांब थांब
किती वाजले सांग सांग
दोन तुझे काटे, लहान आणि मोठे दिसतात कसे.
दोन हात जसे भर भर धावतात
भर भर पळतात एक ते बारा,
एक ते बारा ह्याच्या पुढे जात नाही
पुढचे आकडे माहित नाही
भिंतीवर, टेबलावर कुणाकुणाच्या हातावर
ऐटी मध्ये बसायचं किती वाजले सांगायचं
एक कान पिरगाळला टिकटिक टिकटिक सुरु करा
दुसरा कान पिरगाळला पहाटेला उठाव मला
सारा जग झोपलं तुला नाही विसावा
सारखा काम काम काम कशाला धावतोस सांग सांग
माहिती संकलन - अमरीन पठाण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा