जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी येथे संविधान दिन उत्साहात साजरा.
लहानघोडी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी, ता. सुरगाणा, जि. नाशिक येथे २६ नोव्हेंबर हा संविधान दिन विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रताप देशमुख सर यांनी भारतीय संविधानाच्या पुस्तकाचे वाचन करून विद्यार्थ्यांना संविधानाची निर्मिती, त्याचे महत्त्व, संविधान सभेचे कार्य, भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार व कर्तव्ये यांविषयी सविस्तर माहिती दिली. संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये प्राप्त झाली आहेत. प्रत्येकाने संविधानाचा आदर करून जबाबदार नागरिक बनावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
त्यानंतर प्राथमिक शिक्षक श्री. मधुकर राऊत सर यांनी विद्यार्थ्यांकडून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे (प्रस्तावनेचे) सामूहिक वाचन करून घेतले. तसेच प्रस्तावनेतील सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या महत्त्वपूर्ण संकल्पनांचा अर्थ विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितला. संविधानातील मूल्ये दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
संविधान दिनाचे औचित्य साधून शाळेत विद्यार्थ्यांसाठी संविधानाच्या उद्देशिकेचे पाठांतर व लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्तरानुसार दोन गट तयार करण्यात आले.
गट क्रमांक १ – इयत्ता पहिली व दुसरी
- प्रथम क्रमांक : रुचिता पवार
- द्वितीय क्रमांक : नलिनी ठाकरे
गट क्रमांक २ – इयत्ता तिसरी व चौथी
- प्रथम क्रमांक : हर्षवर्धन वार्डे
- द्वितीय क्रमांक : अश्विनी गायकवाड
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून संविधानाच्या उद्देशिकेचे पाठांतर व सुंदर लेखन सादर केले. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची ओळख, लोकशाही मूल्यांचे महत्त्व, समानतेची भावना, राष्ट्रीय एकात्मता तसेच जबाबदार नागरिक म्हणून आपल्या कर्तव्यांची जाणीव करून देण्यात आली.
'संविधानाचा आदर करूया, लोकशाही मूल्ये जपूया आणि जबाबदार नागरिक बनूया!' हा प्रेरणादायी संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा