रविवार, ४ ऑक्टोबर, २०२६

नाशिक पर्यटन महोत्सव


नाशिक पर्यटन 

देशदूत (नाशिक आवृत्ती - ०४ ऑक्टोबर २०२६ - दिंडोरी 

आदिवासी तालुके पर्यटन स्थळे म्हणून घोषित करा : खा. भगरे


■ सुरगाणा | प्रतिनिधी


नाशिक जिल्ह्यातील आदिवासी तालुके हे पर्यटन स्थळे म्हणून घोषित केल्यास खूप चांगल्या सुखसोयी या भागात येतील, असे प्रतिपादन खासदार भास्कर भगरे यांनी केले. 


पिंपळसोंड तातापाणी येथे पर्यटन विकास महामंडळ महाराष्ट्र शासन आयोजित नाशिक फेस्टिव्हल सांस्कृतिक वारसा महोत्सवात खा. भगरे बोलत होते. व्यासपीठावर पर्यटन विभाग मंत्रालय उपसचिव संतोष रोकडे, नाशिक पर्यटन विभागाचे जगदीश चव्हाण, यामिनी मुंडावरे, मिटकॉन पुणेचे श्रीकांत काकडे, देविदास थोरात, महेश बेले, गोंडुणे सरपंच संजाबाई खंबायत, खुंटविहीर सरपंच आनंदा झिरवाळ, रामदास केंगा, शिवराम चौधरी, जल परिषदेचे देविदास कामडी, रतन चौधरी, मधुकर राऊत आदी उपस्थित होते. खासदार भास्कर भगरे पुढे म्हणाले की, मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो मात्र धरणे नसल्याने स्थलांतर केले जाते. लोकांना स्वतःचा रोजगार निर्माण करायचा असेल तर खाद्य संस्कृती, विविध हस्तकलेच्या वस्तू आधारित आबा जनजागृती ग्राम उत्कर्ष अभियान मार्फत पर्यटन वाढवले पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी खासदार भगरे यांनी पावरी, डांगी नृत्य, बोहाडा नृत्यांसह पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे दर्शन घेत रावणाची बांधित ताटी नृत्यात सहभाग घेतला. महोत्सवात पारंपरिक नृत्ये, मुखवटा कला, वाद्ये आणि आदिवासी खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडत आहे. चिंचपाडा येथील महोत्सवाचे उद्घाटन आमदार नितीन पवार यांच्या हस्ते, तर पिंपळसोंड येथील उद्घाटन खासदार भास्कर भगरे यांच्या हस्ते झाले. पारंपरिक नृत्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. आमदार नितीन पवार यांनी पारंपरिक डोगऱ्यादेव महोत्सवासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. पिंपळसोंड येथे आदिवासी सांस्कृतिक कला दालन वस्तू संग्रहालय उभारण्यासाठी खासदार निधीतून १० लाख रुपये उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रादेशिक अधिकारी संतोष रोकडे यांनी कलाकारांनी आपल्या कलापथकांची नोंदणी करून गुरु-शिष्य परंपरेतून लोककलांचे संवर्धन करण्याचे आवाहन केले. पर्यटन विकासाचा निधी संबंधितांपर्यंत पोहोचतो का, याची पडताळणी करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. 'आई' योजनेअंतर्गत पर्यटन व्यवसायासाठी पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध होण्याच्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. सुरगाणा तालुक्यात पर्यटनविकासासाठी रस्त्यांची सुधारणा, गावपातळीवर होमस्टे सुविधा आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. महोत्सवात बोहाडा मुखवटे बनविण्याची प्रक्रिया, पिंपळसोंड व डोलहारे येथील मुखवटा नृत्य, पारंपरिक वेषभूषा आणि आदिवासी जीवनशैलीचे प्रदर्शन करण्यात आले. महिलांनी उभारलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर स्थानिक मसालेदार पदार्थ, रानभाज्या आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा आस्वाद पर्यटकांनी घेतला. शेती, मजुरी, निसर्गाशी असलेले नाते आणि लोकपरंपरांचे दर्शनही घडले. यावेळी पुस्तक प्रकाशनचा कार्यक्रम पार पडला. आदिवासी लोककला आणि परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासह सुरगाणा तालुक्याचा निसर्ग पर्यटन केंद्र म्हणून विकास करण्याच्या दृष्टीने हा महोत्सव महत्वपूर्ण ठरत आहे.