शनिवार, १२ सप्टेंबर, २०२६

मॅक स्टेशन पुणे यांच्या मार्फत टॅब वाटप



मॅक स्टेशन पुणे यांच्या सहकार्याने मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव


सुरगाणा येथे तालुकास्तरीय पारितोषिक वितरण व टॅब वाटप सोहळा उत्साहात संपन्न


सुरगाणा, दि. ११ सप्टेंबर २०२६ : मंथन वेलफेअर फाउंडेशन, अहिल्यानगर संचलित मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा व ऑलिंपियाड परीक्षा–२०२६ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा तालुकास्तरीय पारितोषिक वितरण व टॅब वाटप सोहळा पी. एम. श्री. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सुरगाणा–२ येथे उत्साहात संपन्न झाला.


https://jaymalharnews.com/details.php?news=22097


शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे, त्यांच्यामध्ये सामान्यज्ञानाची आवड निर्माण करणे तसेच भविष्यातील विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, या उद्देशाने मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा व ऑलिंपियाड परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.


या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन श्री. मधुकर राऊत सर यांच्या पुढाकाराने व नियोजनातून करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवून त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य राऊत सर यांच्या माध्यमातून सातत्याने केले जात आहे.


कार्यक्रमाच्या शुभहस्ते मा. कुबेर तुकाराम पोपटी (पोपटी काका) यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पारितोषिक वितरण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. महेश नेहे, मा. श्री. संजय तांबे व मा. श्री. सुनील पेलमहाले, विस्तार अधिकारी (शिक्षण), पंचायत समिती सुरगाणा उपस्थित होते.


मॅक स्टेशन पुणेचे शैक्षणिक क्षेत्राला मोलाचे सहकार्य


कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांना करण्यात आलेले टॅब वाटप. मॅक स्टेशन, सदाशिव पेठ, पुणेचे श्री. मुकेश पवार यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी टॅब उपलब्ध करून देत या उपक्रमाला मोलाचे सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अध्ययनाच्या अधिक संधी मिळाव्यात, या उदात्त हेतूने त्यांनी केलेल्या या सहकार्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे विशेष कौतुक केले.


तसेच श्री. राहुल मदने, पुणे व मा. कुबेर तुकाराम पोपटी (पोपटी काका) यांच्या विशेष प्रयत्नातून टॅब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी दिलेले हे सहकार्य प्रेरणादायी ठरत आहे.


यावेळी श्री. रतन चौधरी, एस. के. चौधरी, भागवत धूम, मनोहर भोये, सुधाकर भोये, रामभाऊ थोरात, शशिकांत बागुल, भास्कर झिरवाळ, छगन गावित, योगिता चव्हाण, नारायण महाले, दिलीप ठाकरे, योगिता जाधव, स्मिता दळवी तसेच सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकवृंद उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास बागुल यांनी केले. विद्यार्थ्यांच्या शोधकवृत्तीला, कल्पकतेला व स्पर्धात्मक वृत्तीला चालना देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला.


“विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य दिशा, आधुनिक साधनांची जोड आणि समाजातील दानशूर व्यक्तींचे सहकार्य मिळाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठी शैक्षणिक झेप घेऊ शकतात,” असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

*सुरगाणा येथे विद्यार्थ्यांसाठी मंथन सामान्यज्ञान परीक्षेचे बक्षीस वितरण... मान्यवरांची उपस्थिती...*

📎

*VDO पाहा...*👇🏽

https://youtu.be/BsjWYro8njQ?si=Y82EeM-Gdnlob2nb



*विजयकुमार इंगळे : संपादक*

*SCN NEWS* 📹

























मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२६

एका विनंतीला दिलेला मान… आणि शाळेच्या सौंदर्यात पडलेली भर


🌸 एका विनंतीला दिलेला मान… आणि शाळेच्या सौंदर्यात पडलेली भर! 🎨

अंगणवाडीच्या रंगरंगोटीचे काम सुरू असताना मधुकर राऊत सरांनी केलेल्या एका छोट्याशा विनंतीला मान देत, पेंटर रवींद्र पीठे व गणेश शेवरे (रा. राहुडे) यांनी अंगणवाडीलगत असलेल्या शाळेच्या मागील भिंतीची रंगरंगोटी कोणतेही मानधन न घेता मोफत करून दिली. 🎨🌈

त्यांनी दाखवलेली ही आपुलकी, सहकार्याची भावना आणि सामाजिक बांधिलकी निश्चितच कौतुकास्पद आहे. 🙏💐

या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. देशमुख सर, अंगणवाडी ताई कमलबाई राऊत, शिक्षक श्री. मधुकर राऊत सर तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी रवींद्र पीठे व गणेश शेवरे यांचे मनःपूर्वक स्वागत  अभिनंदन केले व आभार मानले . 🌷👏

शाळेसाठी केलेल्या या सुंदर आणि निःस्वार्थ सहकार्याबद्दल रवींद्र पीठे व गणेश शेवरे यांचे मनःपूर्वक आभार! 🙏💐

✨ “शाळेसाठी केलेली प्रत्येक छोटी मदत ही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीची मोठी गुंतवणूक असते.” ✨

💐 आपुलकीतून उभी राहते सुंदर शाळा… आणि सहकार्यतून घडते उज्ज्वल पिढी! 💐

सोमवार, ७ सप्टेंबर, २०२६

शैक्षणिक क्षेत्रभेट – बेलबारी



🌿 शैक्षणिक क्षेत्रभेट – बेलबारी 🌿

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी

यांच्या वतीने विद्यार्थ्यांची बेलबारी येथील निसर्गरम्य परिसरात शैक्षणिक क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली.

या क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी परिसरातील विविध नैसर्गिक व धार्मिक स्थळांना भेट देऊन प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळवले. विद्यार्थ्यांनी शिवमंदिर, दोन नद्यांचा संगम, धबधबा तसेच निसर्गरम्य व मनमोहक परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली.

निसर्गाच्या सान्निध्यात विद्यार्थ्यांना पर्यावरण, जलस्रोत, नदीचा संगम, जैवविविधता व स्थानिक भौगोलिक वैशिष्ट्यांची माहिती मिळाली. प्रत्यक्ष निरीक्षण, अनुभव आणि आनंदातून विद्यार्थ्यांचे ज्ञान अधिक समृद्ध झाले.

ही क्षेत्रभेट विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, अनुभव, आनंद आणि निसर्गप्रेमाची सुंदर पर्वणी ठरली. 🌳💧🏞️

"पुस्तकातील ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळाली की शिक्षण अधिक आनंददायी आणि चिरस्थायी होते."

📍 क्षेत्रभेट स्थळ : बेलबारी

🏫 आयोजक : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी








रविवार, ६ सप्टेंबर, २०२६

मातीतून कलाकृती: राऊत सरांचे प्रेरणादायी उपक्रम

https://youtu.be/EnlWUC77xn4?si=k6fay07rTmCYSGvp


राऊत सरांचे हे कार्य म्हणजे शिक्षणातून संस्कृती संवर्धन आणि विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला पंख देण्याचा प्रेरणादायी उपक्रम! 


सुरगाणा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा घोडी बु. येथील राऊत सर यांनी पिंपळसोंड येथे MTDCच्या प्रशिक्षण उपक्रमात सहभागी होऊन मिळालेले कौशल्य आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देत मातीपासून बोहाडा मुखवटे, पक्षी, प्राणी आणि विविध कलाकृती साकारून घेतल्या आणि त्यांचे शाळेत सुंदर लघु कला-संग्रहालय उभे केले. 

ही केवळ कलाकृती नाहीत, तर आपल्या आदिवासी संस्कृतीचा वारसा, विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेची ओळख आणि भविष्यातील कलाकार घडविण्याची पायाभरणी आहे.

“शाळेत फक्त पुस्तकी ज्ञान नको, तर आपल्या मातीतली कला आणि संस्कृतीही शिकवली पाहिजे.”

राऊत सर आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 

अशा शिक्षकांमुळे ग्रामीण शाळा ज्ञानासोबतच कला, संस्कृती आणि सृजनशीलतेची केंद्रे बनतात

*मातीतून कलाकृती: राऊत सरांचे प्रेरणादायी उपक्रम*

https://youtu.be/EnlWUC77xn4?si=k6fay07rTmCYSGvp


तुमच्या परिसरातील सर्व बातम्या पाहण्यासाठी आणि *बातम्या शेअर करून कमाई करण्यासाठी सुरू ॲप (Shuru App) डाउनलोड करा* 👇🏻


https://shuru.co.in/dl/pc5SPO

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२६

लहानघोडी शाळेत विद्यार्थ्यांनी साकारला ‘आजचे शिक्षक’ उपक्रम


📰 लहानघोडी शाळेत विद्यार्थ्यांनी साकारला ‘आजचे शिक्षक’ उपक्रम

लहानघोडी : जि. प. प्राथमिक शाळा, लहानघोडी येथे शिक्षक दिन उत्साहात आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनीच शिक्षकांची भूमिका स्वीकारून आपल्या सहाध्यायांना विविध विषयांचे अध्यापन केले.

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत ‘आजचे शिक्षक’ म्हणून वर्गात शिकविण्याचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने फळ्यावर लेखन करत इतर विद्यार्थ्यांना विविध संकल्पना समजावून सांगितल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि जबाबदारीची भावना विकसित होण्यास मदत झाली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला थोर शिक्षणतज्ज्ञ व भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच टीव्हीच्या माध्यमातून त्यांच्या जीवनकार्याची व शैक्षणिक योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली.

‘आजचे विद्यार्थीच आजचे शिक्षक’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शाळेतील वातावरण आनंदमय झाले. विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका प्रत्यक्ष अनुभवत शिकविण्यातील आनंद घेतला.

या संपूर्ण उपक्रमासाठी मार्गदर्शक मुख्याध्यापक श्री. प्रताप देशमुख तसेच सहकारी शिक्षक श्री. मधुकर राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचा अनोखा अनुभव घेतला.

विद्यार्थ्यांच्या सहभागातून साकारलेला हा ‘आजचे शिक्षक’ उपक्रम शिक्षक दिनाचे खरे औचित्य साधणारा आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

शनिवार, १८ जुलै, २०२६

शालेय निवडणूक २०२६-२७

 जि.प.प्राथमिक शाळा, लहानघोडी येथे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात संपन्न .

सुरगाणा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लहानघोडी येथे आज शालेय मंत्रिमंडळ निवडणूक लोकशाही पद्धतीने अत्यंत उत्साहात पार पडली. भारत निवडणूक आयोगामार्फत सध्या राबविण्यात येत असलेल्या विशेष मतदार यादी पुनरावलोकन (SIR - Special Intensive Revision) कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये, मतदानाचा अधिकार, निवडणूक प्रक्रिया आणि जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्यांची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज भरणे, निवडणूक चिन्हांची निवड, प्रचार करणे, मतदारांशी संवाद साधणे, गुप्त मतदान करणे तसेच मतमोजणी अशी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया स्वतःच्या सहभागातून यशस्वीरीत्या पार पाडली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अभ्यास मंत्री, अर्थमंत्री, स्वच्छता व आरोग्य मंत्री, अन्न व भोजन मंत्री तसेच क्रीडा व सांस्कृतिक मंत्री अशा विविध पदांसाठी निवडणूक घेण्यात आली.

मतदानानंतर पारदर्शक पद्धतीने मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला. त्यानुसार शालेय मंत्रिमंडळाची पुढीलप्रमाणे निवड करण्यात आली –

मुख्यमंत्री: अश्विनी गायकवाड

उपमुख्यमंत्री: पंकज ठाकरे

अभ्यास मंत्री: संकेत पवार

अर्थमंत्री: हर्षवर्धन वाघमारे

स्वच्छता व आरोग्य मंत्री: निर्जला मोरे

क्रीडा व सांस्कृतिक मंत्री: गायत्री पवार

अन्न व भोजन मंत्री: प्रतिष्ठा चौधरी

विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध, जबाबदारीने आणि उत्साहाने सहभाग नोंदविल्यामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, लोकशाहीची जाणीव, जबाबदारीची भावना, संघभावना आणि निर्णयक्षमतेचा विकास होण्यास निश्चितच मदत झाली.

या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रताप देशमुख यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच उपशिक्षक श्री. मधुकर काशिनाथ राऊत यांनी विद्यार्थ्यांना लोकशाहीचे महत्त्व, मतदानाचा अधिकार, निवडणूक प्रक्रिया, मतदारांची जबाबदारी आणि प्रामाणिक नेतृत्वाचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया उत्साहाने आणि यशस्वीरीत्या पार पाडली.

शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि सर्व विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या नियोजन, शिस्त आणि लोकशाही प्रक्रियेतील सक्रिय सहभागाचे मनापासून कौतुक केले.










शुक्रवार, १७ जुलै, २०२६

मूल्यवर्धन भेट 17/4/2026



आज दि १७ जुलै २०२६ रोजी मूल्यवर्धन तालुका समन्वयक श्री. सुधाकर पवार सर यांनी आज जि.प.शाळा - लहानघोडी  येथे भेट दिली शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत केले. मुल्यवर्धन बाबत चर्चा केली. रागावर नियंत्रण कसे करावे या बाबत चर्चा करतांना विद्यार्थ्यांनी चांगले उत्तरे दिली. तसेच शालेय परिसरात लागवड केलेल्या वास्तुंची माहिती घेतली व मूल्यवर्धन उपक्रमाविषयी  मार्गदर्शन केले. सदर भेटी दरम्यान पेसा अध्यक्ष श्री. हेमंत भुसारे व गावातील पालक उपस्थित होते मूल्यवर्धन उपक्रमबाबत पालकांना मार्गदर्शन केले. व मूल्यवर्धनाची गरज व महत्व सांगीतले . शाळेच्या वतीने खुप खुप धन्यवाद.

मंगळवार, १४ जुलै, २०२६

एक दिवस शाळेसाठी - 1

​🌳 "एक दिवस शाळेसाठी"उपक्रमांतर्गत श्रमदान! 🌳

​जि. प. प्राथमिक शाळा, लहानघोडी येथे पालकांच्या सहभागातून शाळा परिसर सुशोभीकरण संपन्न.

​📌 उपक्रमाचा संक्षिप्त तपशील:

​दिनांक: १४ जुलै २०२६

​ठिकाण: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लहानघोडी (ता. सुरगाणा, जि. नाशिक)

​उपक्रम: 'एक दिवस शाळेसाठी' (शाळा परिसर सुशोभीकरण व झाडे छाटणी)

​📝 सविस्तर वृत्त:

​आज दि. १४ जुलै २०२६ रोजी 'एक दिवस शाळेसाठी' या स्तुत्य उपक्रमांतर्गत जि. प. प्राथमिक शाळा लहानघोडी ता. सुरगाणा जि नाशिक येथे शालेय परिसराची स्वच्छता व सुशोभीकरण करण्यात आले.

​या मोहिमेत शाळेचे जागरूक पालक श्री. कैलास पवार आणि श्री. विजय गायकवाड यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी स्वतः उपस्थित राहून शालेय परिसरातील झाडांची पद्धतशीर छाटणी केली व संपूर्ण परिसर नीटनेटका आणि सुशोभित करण्यासाठी मोलाचे श्रमदान केले. त्यांच्या या पुढाकारामुळे शाळेचा परिसर अतिशय प्रसन्न आणि सुंदर दिसत आहे.

​शाळेच्या वतीने आभार:

पालकांचा असा सक्रिय सहभाग हा शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरतो. शाळेच्या हाकेला ओ देऊन बहुमूल्य वेळ आणि योगदान दिल्याबद्दल श्री. कैलास पवार व श्री. विजय गायकवाड यांचे शाळेच्या वतीने, शिक्षक वृंद व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने मनःपूर्वक आभार! 🙏

​शाळेच्या प्रगतीसाठी पालकांचे असेच सहकार्य सदैव लाभो, हीच सदिच्छा!

बुधवार, १ जुलै, २०२६

प्रयास फाउंडेशन ट्रस्ट मार्फत मोफत साहित्य वाटप

*विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमलले हासू प्रयास फाउंडेशन'तर्फे मोफत शैक्षणिक साहित्य वाटप*

लहानघोडी (ता. सुरगाणा, जि. नाशिक):

गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी या हेतूने प्रेरित होऊन **'प्रयास फाउंडेशन'**च्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लहानघोडी येथील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास सुकर व्हावा आणि त्यांना शिक्षणाची गोडी लागावी, या उद्देशाने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.  

नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे शैक्षणिक साहित्य मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला. सर्व बालदोस्तांनी हातात वह्या घेऊन आपला आनंद व्यक्त केला. दुर्गम भागातील पालकांना आर्थिक हातभार लागावा आणि मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये, यासाठी फाउंडेशनने घेतलेला हा पुढाकार अत्यंत कौतुकास्पद ठरत आहे.  

सर्व विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप:

या उपक्रमांतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खालील आवश्यक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले:

वही आणि पाटी

पेन्सिल आणि पाटी पेन्सिल

शार्पनर व इतर लेखन साहित्य

मान्यवरांची उपस्थिती:

या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, प्रयास फाउंडेशनचे पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ आणि माता-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण व दुर्गम भागातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती टिकवून ठेवण्यासाठी अशा सामाजिक संस्थांचे सहकार्य मोलाचे ठरते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.  

शेवटी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने प्रयास फाउंडेशनचे मनापासून आभार मानण्यात आले.