शुक्रवार, २४ एप्रिल, २०२६

निरोप समारंभ

 


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लहानघोडी (ता. सुरगाणा, जि. नाशिक) येथे दि २४/ ४/ २०२६ वार शुक्रवार रोजी  चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अतिशय भावनिक वातावरणात पार पडला. शाळेच्या छोट्याशा परिसरात आज वेगळंच वातावरण होतं—आनंद, अभिमान आणि विरह यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळत होता.

चार वर्षांपूर्वी हातात पाटी-पुस्तक घेऊन भीतभीत शाळेत आलेली ही चिमुकली लेकरं आज आत्मविश्वासाने पुढच्या प्रवासाला निघाली आहेत. शिक्षकांच्या प्रेमळ मार्गदर्शनाखाली त्यांनी केवळ अक्षरज्ञानच नाही, तर संस्कार, शिस्त, मैत्री आणि जीवनमूल्येही आत्मसात केली. प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर पुढील वाटचालीचा उत्साह दिसत होता, पण डोळ्यांच्या कडा मात्र ओलावलेल्या होत्या.

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेतील आठवणींना उजाळा दिला. .

हा निरोप समारंभ म्हणजे फक्त एक कार्यक्रम नव्हता, तर हृदयाला स्पर्श करणारा एक भावनिक क्षण होता. लहान घोडी शाळेच्या या गोड आठवणी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सदैव जिवंत राहतील, आणि या आठवणींच्या बळावर ते भविष्यात नक्कीच मोठं यश मिळवतील, असा विश्वास प्रत्येकाच्या मनात होता.

या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. भागवत पवार व अंगणवाडी ताई कमल कामडी तसेच पालक वर्ग उपस्थित होते.