असे घडले बालमनाचे दर्शन... जेव्हा चिमुकल्या हातांनी फळ्यावर साकारली स्वतःची शाळा!*
नव्या शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी आमची शाळा सज्ज...
दिनांक: १४ जून २०२६
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे गेल्या महिनाभरापासून बंद असलेल्या आमच्या शाळेची पावले आता पुन्हा गजबजणार आहेत. नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या उत्साही स्वागतासाठी आज, १४ जून रोजी शाळेत विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
महिनाभर शाळा बंद असल्यामुळे वर्गखोल्यांमध्ये आणि शालेय परिसरात धूळ-मातीचे साम्राज्य पसरले होते. विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत जणू उंदरांनीच पुस्तकांचा आणि वर्गाचा 'अभ्यास' मांडला होता! पण आज शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, शालेय स्वयंपाकी आणि मदतनीस या सर्वांनी एकत्र येत कंबर कसली. एकमेकांच्या साथीने संपूर्ण शालेय परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला. वर्गखोल्यांमधील धूळ खटकून काढली, बाके पुसली, उंदरांनी केलेला कचरा साफ केला आणि इतर सर्व अडगळीच्या वस्तू आवरून त्यांची योग्य विल्हेवाट लावली. सर्वांच्या सामूहिक श्रमातून अवघ्या काही तासांतच संपूर्ण शाळा आणि परिसर आरशासारखा चकचकीत झाला. स्वच्छता पूर्ण झाल्यावर, उद्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणारी नवीन पाठ्यपुस्तके देखील इयत्तावार व्यवस्थित लावून ठेवण्यात आली.
शालेय परिसर, वर्ग आणि पुस्तकांची मांडणी तर झाली होती, आता वेध लागले होते ते उद्या येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे! त्यासाठी वर्गात सुंदर 'फलक लेखन' करावे, या विचाराने मी हातात खडू घेतला आणि मुख्य फळ्यावर अक्षरे गिरवायला सुरुवात केली.
तेवढ्यात, शाळा उघडल्याच्या आनंदाने ७-८ उत्सुक विद्यार्थी वर्गाच्या दारात हजर झाले. "सर, आम्ही काही मदत करू का?", "सर, खडू देऊ का?", "पट्टी देऊ का?" असे विचारत ते अगदी कौतुकाने माझ्या मागे उभे राहिले आणि माझे फलक लेखन न्याहाळू लागले. मुलांचा हा उत्स्फूर्त आनंद पाहून मन भरून आले.
त्यातच निर्जला आणि गायत्री या दोघींनी पुढे होऊन हातामध्ये खडू घेतले. जवळच खाली असलेल्या एका लहान फळ्यावर त्यांनी स्वतःच्या कल्पनेने चित्र काढायला सुरुवात केली. बघता बघता त्यांच्या कल्पनेने पंख पसरले! त्यांच्या डोळ्यांसमोर असलेला सुंदर शालेय परिसर, आजूबाजूची हिरवीगार झाडे, दप्तर घेऊन शाळेत येणारे विद्यार्थी आणि मागे असलेले डोंगर त्यांनी फळ्यावर हुबेहूब गिरवायला सुरुवात केली.
माझं मुख्य फलक लेखन पूर्ण होईपर्यंत, या चिमुकल्यांनीही त्यांच्या स्व-कल्पनेला पूर्ण वाव देत, खालील फळ्यावर एक अप्रतिम देखावा साकारला होता.
एकीकडे आम्ही शिक्षकांनी वर्ग स्वच्छ करून, पुस्तके मांडून वर्ग सजवला होता, तर दुसरीकडे या मुलांनी आपल्या कल्पकतेने शाळेचा आत्मा जिवंत केला होता. पहिल्याच दिवशी घडलेले हे बालमनाचे सुंदर दर्शन आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा तो निखळ आनंद पाहून, नव्या वर्षाची सुरुवात खऱ्या अर्थाने सार्थ आणि आनंददायी वाटली!
श्री. एम. के. राऊत
जि.प.प्रा. शाळा - लहानघोडी ता सुरगाणा जि नाशिक


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा