शनिवार, २८ फेब्रुवारी, २०२६

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त बाल वैज्ञानिकांचे प्रयोग सादरीकरण



🔬 राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त बाल वैज्ञानिकांचे प्रयोग सादरीकरण

राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी येथे विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. जि. प. प्रा. शाळा लहानघोडी, ता. सुरगाणा, जि. नाशिक या शाळेत विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी या उद्देशाने दरवर्षी विशेष कार्यक्रम राबविले जातात.

     शनिवार, दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी आंतरराष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी “बाल वैज्ञानिक” म्हणून विविध प्रयोग सादर केले. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या मॉडेल्स आणि प्रयोगांमधून विज्ञानातील मूलभूत संकल्पना अतिशय सोप्या व प्रभावी पद्धतीने समजावून सांगितल्या. शाळेमध्ये उपलब्ध साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी आपले सादरीकरण केले, ही या कार्यक्रमाची विशेष बाब ठरली.

     कार्यक्रमात ज्वालामुखीचे मॉडेल, पाण्याचे शुद्धीकरण, चुंबकाचे गुणधर्म, हवा व पाण्याशी संबंधित प्रयोग, ज्ञानेद्रियांचे कार्य तसेच साधे विद्युत परिपथ अशा अनेक आकर्षक प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले. लहान विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने व स्पष्ट शब्दांत प्रयोगांचे स्पष्टीकरण दिल्यामुळे उपस्थित सर्वजण प्रभावित झाले.

      शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रताप नारायण देशमुख यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान दिनाचे महत्त्व पटवून दिले. महान शास्त्रज्ञांचे कार्य, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे स्थान याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. विज्ञानामुळे समाजाची प्रगती कशी घडते आणि विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्ती जोपासून सतत नवीन गोष्टी शिकत राहावे, असे प्रेरणादायी विचार त्यांनी व्यक्त केले. तसेच शिक्षक श्री. मधुकर काशिनाथ राऊत यांनी विद्यार्थ्यांकडून प्रयोगांचे सादरीकरण करून घेत मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सुसूत्र व नियोजनबद्ध पद्धतीने आपले प्रयोग सादर केले.प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनात शाळेची उत्कृष्ट कामगिरी राहिली असून यंदाही विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली. 

तालुक्याच्या गट शिक्षण अधिकारी मा. श्रीमती अल्पा देशमुख मॅडम व केंद्रप्रमुख श्री. पवार साहेब यांनीही विद्यार्थ्यांच्या प्रयोगांचे मनापासून कौतुक केले.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. भागवत पवार, उपाध्यक्ष श्री. मनोहर गायकवाड तसेच सरपंच मा. हेमलता हेमंत भुसारे यांनीही विद्यार्थ्यांच्या प्रयोगांचे कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

   या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड, प्रयोगशीलता आणि सर्जनशीलता वाढीस लागली. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात पार पडला. लहान वयातच वैज्ञानिक विचारसरणी विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.

















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा